एकीकडे वाळूमाफियांच्या अरेरावीमुळे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुका चिंताग्रस्त आहे. तर दुसरीकडे तहसीलदारांवरच गुन्हा दाखल झाल्याने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. गेवराईचे तहसीलदार सचिन खाडे यांनी महिलांना घरात घुसून धमकी दिल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. तिन्ही फिर्यादी महिला गेवराईच्या समृद्धी नगर भागातील रहिवासी आहेत. वाळु उपशाचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाच आता वाळुचा वाद घरापर्यंत गेला असल्याचे दिसून येतंय. या प्रकरणी तहसीलदार सचिन खाडेंसह सात ते आठ अनोळखी व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गेवराई पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या तीन महिलांच्या फिर्यादीवरुन हे गुन्हे दाखल झाले आहेत. तर या सर्व प्रकरणी जिल्हाधिकारी यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश महिला आयोगाने दिले आहेत. राज्य महिला आयोगाकडून तीन दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.