महाराष्ट्रातील नद्या मोठ्या प्रमाणात प्रदूषित असल्याचा ठपका केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठेवला अाहे. या पार्श्वभूमीवर जलप्रदूषणास जबाबदार असलेल्या राज्यातील उद्योगांना ‘पाणी कपाती’ची शिक्षा देण्याचा निर्णय सरकारने घेतला अाहे. मर्यादेपेक्षा अधिक जलप्रदूषण पसरवणाऱ्या उद्योगांना यापुढे नद्यांचे पाणी उपलब्ध होणार नाही. विशेष म्हणजे पाण्याची कमतरता असलेल्या राज्यातील उपखोऱ्यांमध्ये कागद, वीज प्रकल्प, मिनरल वॉटर, शीतपेय यांसारख्या उद्योगांना पाण्यासाठी दिल्या जाणाऱ्या नव्या सवलती थांबवण्यात याव्यात, असेही महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.अलीकडेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने पर्यावरण मंत्रालयास सादर केलेल्या एका अहवालात देशातील 315 पैकी महाराष्ट्रातील सर्वाधिक 49 नद्या प्रदूषित असल्याचे धक्कादायक चित्र मांडले आहे. महाराष्ट्रातील भीमा, कृष्णा, तापी, पंचगंगा, मुळा-मुठा, गोदावरी, मिठी, वैतरणा या प्रमुख प्रदूषित नद्यांचा समावेश अहवालात आहे. महाराष्ट्रानंतर आसाम, मध्य प्रदेश, गुजरात आणि पश्चिम बंगाल असा सर्वाधिक प्रदूषित नद्यांचा क्रम आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews