Yavatmal : युवती बनून दिल्लीच्या डॉक्टरला दोन कोटींचा घातला गंडा
यवतमाळचा युवक महिला बनून साधायचा संवाद ; एलसीबीने केली एक कोटी 74 रुपयांची रोकड जप्त
Yavatmal : सोशल मीडियावर तरुणी असल्याची बतावणी करून दिल्ली येथील डॉक्टरला दोन कोटी रुपयांनी गंडा घातल्याची तक्रार पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्याकडे संबंधित डॉक्टरने केली होती. या घटनेचा अवघ्या चोवीस तासात छडा लावण्यात यवतमाळ पोलिसांना यश आला. या प्रकरणात एका तरुणाला अटक करून त्याच्याकडून एक कोटी 74 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. हनी ट्रॅपमध्ये अडकविण्याचा प्रयत्न या घटनेत झाला आहे.
संदेश अनिल मानकर (रा. अरुणोदय सोसायटी), असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने महिला बनून बहिणीच्या अपहरणाचा बनाव करुन पैसे उकळले. रजत रतीशकुमार मोयल (४४) रा. डी. पॉकेट ए सिद्घार्थ एक्टेंशन दिल्ली असे फसवणूक झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. त्यांचे फेसबूक, इंस्टाग्राम आणि व्हॉटसअपवर अकाउंट आहे. या माध्यमातूनच त्यांची ओळख झाली. त्याचे रुपातंर मैत्रीत झाले. मैत्रीचे संबंध वेळोवेळी सोशलमिडियावर सुरू होते. दरम्यान आरोपीने खोटा बनाव रचून व खोटी कहाणी सांगून फिर्यादीला आपल्या पाशात ओढले. तसेच मोठा उद्योग, हॉटेल आणि नेहमीच परदेशी येणे-जाणे करावे, लागते, सर्व संपन्न आर्थिक घराण्याशी संबंधित असल्याचे सांगितले. दुबईला लहान बहिणीचे अपरहण झाले आहे, तिला वाचवायचे आहे. दोन कोटीची आवश्यकता आहे, असे खोटे सांगून रक्कमेची मागणी केली. पैसे दिले तर लहान बहिणीचा जीव अपहरणकर्त्यांच्या तावडीतून वाचू शकेल, असे सांगितले. यावर विश्वास ठेवून दोन कोटी रुपये देण्यासाठी डॉक्टर यवतमाळात आले. दारव्हा रोडवरील एकविरा हॉटेल व बारच्या बाहेर समर नामक व्यक्तीस ही रक्कम दिली. त्यानंतर मोबाइलवर संपर्क केला. बहिणीची सुटका झाली असे सांगितले. त्यांनतर आरोपीने मोबाइल पुर्णपणे बंद केला. पैशाची मागणीसाठी संपर्क झाला नाही. डॉक्टरला शंका आल्याने त्यांनी चौकशी केली असता फसवणूक केल्याचे लक्षात आले. या प्रकरणी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला. तसेच एसडीपीओ माधूरी बाविस्कर यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या प्रकरणात एक कोटी ७२ लाख सात हजार रुपये रोख, चार लाखांचे सोन्याचे दागिने, चार मोबाइल असा एकूण कोटी ७८ लाख सहा हजार १९८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे यांच्या मार्गदर्शनात
एसडीपीओ माधूरी बाविस्कर, सपोनि अमोल पुरी, सपोनि गजानन करेवाड, गजानन डोंगरे, विशाल भगत, उल्हास कुरकुटे, कविश पाळेकर, महम्मद भगतवाले, सलमान शेख, किशोर झेंडेकर, पंकज गिरी आदींनी केली.
(..कोट...)
सोशलमिडियाचा वापर करताना अनोळखी व्यक्तीवर त्वरित विश्वास ठेवून त्यांना एन्टरटेन करु नये, यवतमाळ शहरात घडलेल्या या घटनेने खूब मोठा धडा शिकवला आहे. यातून प्रत्येकाने बोध घ्यावा.
-डॉ. दिलीप पाटील भूजबळ
पोलिस अधीक्षक, यवतमाळ.
सूरज पाटील : सकाळ वृत्तसेवा
#Yavatmal