पुणे: हवामानात बदल झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून शहरातील वातावरण बदलले आहे. पुण्यातील सातारा रस्ता, सहकारनगर, पद्मावती, धनकवडी, अरण्येश्रर, वाळवेकरनगर, मित्र मंडळ चौक, पर्वती,स्वारगेट, कात्रज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक, औंध, बाणेर रस्ता, पाषाण रस्ता परिसरात रिमझिम पाऊस सुरू झाला आहे.
पुण्यात ऐन डिसेंबरमध्ये हिवाळ्यात काही वेळ पावसाच्या सरी देखील बरसल्या आहेत. सोमवारपासून आठवड्याची कामाची सुरुवातीलाच सकाळी सकाळी नागरिकांना पावसाच्या सरी झेलाव्या लागत आहे.
दरम्यान, पुणेकरांनी रविवारी सुटीच्या दिवशी दिवसभर ढगाळ वातावरण अनुभवले. शहराच्या मध्य वस्तीतील पेठांसह काही उपनगरांमध्ये तुरळक पावसाने हजेरी लावली. सोमवारीही (ता. १४) आकाश अंशतः ढगाळ असेल; तसेच, हलक्या पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याने वर्तविली होती.
राज्याच्या उत्तर भागात दोन दिवसांपासून कमी दाबाचे क्षेत्र होते. त्यामुळे मध्य महाराष्ट्रासह उत्तर मध्य महाराष्ट्र, विदर्भात ढगाळ वातावरण होते. त्याची तीव्रता कमी झाली आहे. अरबी समुद्रावरून बाष्पाचा पुरवठा होत आहे. त्यातच जमिनीलगत वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे काही भागांत हवेत काहीसा गारठा वाढला आहे.
पुण्यात १०.४ अंश सेल्सिअसपर्यंत कमी झालेला किमान तापमानाचा पारा १८.७ अंश सेल्सिअसपर्यंत वाढला आहे. सरासरीपेक्षा ७.५ अंश सेल्सिअसने हे तापमान वाढले आहे. येत्या बुधवारपासून (ता. १६) आकाश निरभ्र होण्यास सुरवात होईल.
का आलेत ढग?
बुरेवी चक्रीवादळामुळे अरबी समुद्राच्या दक्षिण भागात हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. त्यामुळे काही भागात ढगाळ हवामान होत आहे. दरम्यान, बंगाल उपसागराच्या नैऋत्य भागात पुन्हा चक्रीवादळासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. तेथे उंचीवरून वारे वाहत आहेत. त्यामुळे दक्षिणेकडील समुद्रामध्ये नोव्हेंबर महिन्यात आणि डिसेंबरच्या सुरुवातीपासून चक्रीवादळांची मालिका सुरू आहे.
(व्हिडिओ - अजित गस्ते)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.