रुईया महाविद्यालयातील माजी विद्यार्थी असलेल्या पोन्नलागर देवेंद्र देवेंद्र यांनी २०१० साली दृष्टिहीन तरुण-तरुणींसाठी नयन फाऊंडेशनची स्थापना केली. पोन्नलागर देवेंद्र हे स्वतः अंशतः अंध आहेत. दृष्टिहीन आणि अंशतः अंध तरुण-तरुणींना ट्रेकिंगचा अनुभव मिळावा या साध्या-सोप्या उद्देशासाठी संस्थेनं काम सुरू केलं. संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत १४ यशस्वी ट्रेकिंगचा टप्पा पूर्ण झाला आहे. ट्रेकिंगबरोबरच बुध्दीबळ स्पर्धा, योग प्रात्यक्षिकं, मल्लखांब अशा कार्यक्रमांची आखणी संस्था करते. इतकंच काय तर महाराष्ट्रातील पहिलं दृष्टिहीन गोविंदा पथक याच संस्थेनं तयार केलं आहे. सामाजिक जाणिवेतून स्थापन झालेल्या या संस्थेनं आज दृष्टिहीन तरुण-तरुणींच्या कलागुणांना वाव देणाऱ्या एका व्यासपीठाचं रुप घेतलं आहे.