एकीकडे क्रिकेटच्या मैदानात भारत-पाकिस्तानमध्ये रनयुद्ध रंगणार असताना महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना आणि शिंदेसेनेत मध्यवर्ती कार्यालयावरुन नवा सामना सुरु झालाय... मुंबईत दादर इथलं शिवसेना भवन हे शिवसेना पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय आहे. शिंदे गट शिवसेना भवनावर दावा करत असल्याची चर्चा सुरु असतानाच शिंदे गटाने शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचा पत्ताच बदललाय. शिंदे गटाकडून जारी केलेल्या नियुक्ती पत्रावर दादरच्या शिवसेना भवनाऐवजी ठाण्याच्या टेंभी नाका इथल्या आनंद आश्रमचा पत्ता देण्यात आलाय... आमदार, खासदार, नगरसेवकांसह अनेक पदाधिकाऱ्यांना आपल्या बाजूनं केल्यानंतर शिंदेच्या समर्थनात गर्दी होतेय.कार्यकर्त्यांचीही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळेच मध्यवर्ती कार्यालयाची आवश्यकता असल्याचं शिंदे गटाकडून सांगण्यात येत होतं. तसंच आता प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी शिंदे गटाची कार्यालय उभारण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आलं... इतकंच नाही तर जेव्हा मुंबईत कार्यकर्ते जमतील म्हणूनच की काय एकनाथ शिंदे गटानं आनंद आश्रम या नव्या कार्यालयाची निवड केलीय. त्यामुळे शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचा पत्ता आता शिवसेनाभवनऐवजी ठाण्यातील आनंदआश्रम असेल का अशा चर्चा सुरु झाल्यात...