2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘डिस्ने’च्या ‘द इन्क्रेडिबल्स’ या कार्टून सुपरहिरोपटाने ‘डीसी’ आणि ‘माव्र्हल’चे सुपरहिरो विश्व हादरवून सोडले होते. ऑस्कर पुरस्कार पटकावणाऱ्या या चित्रपटाने इतिहासातील सर्वोत्कृष्ट सुपरहिरोपट म्हणून नावलौकिक मिळवले. आणि आता याच फॉम्र्युल्याची पुनरावृत्ती करण्याचा निर्णय ‘डिस्ने’ने घेतला असून ‘द इन्क्रेडिबल्स 2’ हा सुपरहिरो कार्टूनपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘द इन्क्रेडिबल्स’ ही आई-वडील आणि तीन लहान मुले असलेल्या एका कुटुंबाची कथा आहे. या कुटुंबातील प्रत्येक सदस्याकडे एक विशेष शक्ती आहे. इतर सर्वसामान्य लोकांप्रमाणेच जीवन व्यतीत करणारी ही मंडळी वेळप्रसंगी आपला सुपरहिरो गणवेश परिधान करुन गरजू लोकांची मदत करतात. इंग्रजी, हिंदी, रशियन, जर्मन अशा 12 पेक्षा जास्त भाषेत डब झालेल्या या चित्रपटातील व्यक्तिरेखांना 30 पेक्षा जास्त कलाकारांनी आवाज दिला आहे. प्रामुख्याने इंग्रजीत आवाज देणाऱ्या क्रेग नेल्सन, होली हंटर, सॅम्युएल जॅक्सन, जेसन लीया या कलाकारांचे विशेष कौतुक झाले. हिंदीतही सुपरस्टार शाहरुख खान, रक्षंदा खान, आर्यन खान, अमी त्रिवेदी यांनी या चित्रपटासाठी आवाज दिला होता.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews