पुणे : पुण्यात आज (23 जाने.) वसंतदादा शुगर इंस्टिट्यूटची 48 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पारितोषिक समारंभ पार पडत आहे. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आणि विश्वस्त दिलीप वळसे पाटील यांच्यासह संस्थेचे विश्वस्त आणि नियामक मंडळ सदस्य उपस्थित आहे. राष्ट्रवादी फुटीनंतर अनेक ठिकाणी अजित पवार हे काका शरद पवार यांच्या समोर येत नसल्याचं बघायला मिळालं. आजही शरद पवारांच्या उजव्या बाजूला अजित पवार तर डाव्या बाजूला दिलीप वळसे पाटील अशी बैठक व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, यावेळी अजित पवारांनी शरद पवारांच्या बाजूला बसण्याचं टाळलं असल्याचं दिसून आलं. कार्यक्रमाच्या ठिकाणी अजित पवार येताच त्यांच्या नावाची पाटी काढून त्या ठिकाणी बाबासाहेब पाटील यांच्या नावाची पाटी ठेवण्यात आली. त्यामुळं राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय.