ठाणे : बदलापुरात सुरू असलेल्या राष्ट्रीय कीर्तन महोत्सवात शनिवारी २०० पखवाज वादकांची जुगलबंदी पाहायला मिळाली. ही जुगलबंदी याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी वारकरी बांधवांसोवतच सर्वसामान्य बदलापूरकरांनीही मोठी गर्दी केली होती. बदलापुरात भाजपा आमदार किसन कथोरे यांच्या वतीने राष्ट्रीय कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला असून यंदाचं या महोत्सवाचं २२ वं वर्ष आहे. यंदा समारोपाच्या आदल्या दिवशी शनिवारी पखवाज वादकांच्या जुगलबंदीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मृदंगचार्य शंकरदादा मेस्त्री, एकनाथ बुवा भाग्यवंत, छगनबुवा नेमणे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे २०० पखवाज वादक या जुगलबंदीत सहभागी झाले आहेत ज्यात अगदी लहानग्या पखवाज वादकांचाही सहभाग होता. पखवाज वादकांची जुगलबंदी सुरू असताना वारकऱ्यांनीही ठेका धरला होता. हा सोहळा अनुभवण्यासाठी बदलापूरकरांनीही गर्दी केली होती. रविवारी (आज) काल्याच्या किर्तनानं या राष्ट्रीय कीर्तन महोत्सवाचा समारोप होणार आहे.