बुलढाणा : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांचा आज (12 जाने.) जन्मदिवस. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील राजे लखुजी जाधव यांच्या राजवाड्यात राजमाता जिजाऊंचा जन्म झाला होता. दरवर्षी 12 जानेवारीला मोठ्या उत्साहात या ठिकाणी जिजाऊ जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो. त्यानिमित्तानं राजे लखुजी जाधव यांच्या राजवाड्यावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई केली जाते. यंदाही मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई करण्यात आली असून राजमाता जिजाऊंच जन्मस्थळ आकर्षक अशा पुष्पहारांनी सजवण्यात आलंय. राजमातेला मानाचा मुजरा करण्यासाठी जिजाऊ प्रेमींच्या सकाळपासूनच रांगा लागल्या आहेत. दरम्यान, आज सूर्योदयावेळी माँ साहेबांची शासकीय महापूजा करण्यात आली. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी सपत्नीक जिजाऊंची पूजाअर्चा केली. यावेळी राजे लखुजी जाधव यांचे वंशज शिवाजी जाधव हे देखील उपस्थित होते. त्यानंतर आमदार मनोज कायंदे, माजी आमदार शशिकांत खेडेकर यांनी देखील राजमाता जिजाऊंना अभिवादन केलं.