मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या निमित्ताने शिवतीर्थावरून म्हणजेच मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावरून त्यांची ठाकरी तोफ डागली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातलं राजकारण, महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडी यांसारख्या अनेक विषयांवर आपल्या खास शैलीत भाष्य केलं. यावेळी त्यांनी पुन्हा मशिदींवरच्या भोंग्यांचा मुद्दा प्रकाशात आणला. 'आज मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सांगू इच्छितो तुम्हाला शिवसेना नाव मिळालं आहे. चिन्ह मिळालं आहे. गेल्या वर्षी भोंग्यांचं आंदोलन झालं त्यावेळी मनसेच्या १७ हजार लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत ते गुन्हे मागे घ्या. आता मशिदींवरचे भोंगे परत वाजू लागले आहेत. एक तर तुम्ही ते बंद करा किंवा मग आम्ही काय करतो आहे त्याकडे दुर्लक्ष करा आम्ही आमच्या पद्धतीने हे भोंगे बंद करू' अस राज ठाकरे म्हणाले.