छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेलं साखळी उपोषण एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मागे घेतलं आहे. जलील यांनी छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांची भेट घेतल्यानंतर उपोषण मागे घेत असल्याची माहिती माध्यमांना दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, 'काही संघटनांकडून शहरात वातावरण खराब करण्याचा प्रयत्न सुरू असल्याने आपण उपोषण मागे घेत आहोत. दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये तसेच दोन्ही समाजाने समजदारीची भूमिका घ्यावी असे आवाहन इम्तियाज जलील यांनी केले आहे. तसेच शिवीगाळ ऑडिओ प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यावर पोलीस आयुक्तांनीच कारवाई करावी अशी मागणीही जलील यांनी केली.