शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन पुन्हा लागू करण्यासाठी कोल्हापुरात गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. या मोर्चामध्ये तब्बल ९० संघटनांनी सहभाग घेतला. यावेळी मोर्चाला संबोधित करताना आमदार सतेज पाटील आक्रमक झालेले पाहायला मिळाले, 'वणवा पेटला असून आता माघार घेऊ नका. राज्य सरकारच्या कोणत्याही दबावाला बळी पडू नका. तुमच्या सर्व संघटनामध्ये एकी ठेवा कारण महाविकास आघाडी म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत' असे म्हणत पाठिंबा देत 'उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही केवळ सकारात्मक चर्चा करू नका. येत्या अधिवेशनात जुन्या पेन्शनचा निर्णय जाहीर करा' असा इशाराही यावेळी सतेज पाटील यांनी दिला.