"महाराष्ट्राच्या लावणीसम्राज्ञी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुलोचना चव्हाण यांचं आज १० डिसेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झालं. त्या ९२ वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. अखेर आज दुपारी १२ च्या सुमारास फणसवाडी येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात धाकटा मुलगा, सून, मोठ्या मुलाची पत्नी, नातवंडे असा परिवार आहे.
१३ मार्च १९३३ रोजी मुंबईत त्यांचा जन्म झाला. आज संध्याकाळी मरिन लाइन्स येथे अंत्यसंस्कार होणार आहे. 'फड सांभाळ तुऱ्याला गं आला...' 'पाडाला पिकलाय आंबा..' 'मला म्हणत्यात पुण्याची मैना' यांसारख्या एकाहून एक लावण्या सुलोचना चव्हाण यांनी आपल्या खर्जातल्या आवाजाच्या जादूने ठसकेबाज केल्या. याच वर्षी त्यांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता. तेव्हा व्हिलचेअरवर बसूनच त्यांनी तो स्वीकारला होता. तेव्हापासून सुलोचना यांची प्रकृती फारशी चांगली नसल्याचं दिसलं होतं. यानंतर त्या कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमातही दिसल्या नाहीत.
#SulochanaChavhan #mumbai #lavni #marinedrive #hwnewsmarathi #maharashtra #hwnewsmarathi