आयपीएलमध्ये सोमवारी झालेल्या सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्सच्या सामन्यात लखनौचा गोलंदाज आवेश खान हा गेमचेंजर ठरला. २४ धावात चार बळी घेत हा विजय त्याने आईला समर्पित केलाय. आवेश ज्यावेळी डी. वाय. पाटील मैदानावर खेळत होता त्यावेळी त्याची आई शबीहा खान मात्र इंदूरच्या हॉस्पीटलमध्ये होत्या.आवेशने सामन्यात त्याला मिळालेल्या यशाचं श्रेय त्याच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आईला दिलंय. आवेशने सांगितले की, 'माझी आई सध्या रुग्णालायत दाखल आहे. मला या सामन्यात मिळालेल्या यशाचं श्रेय मी आईला देतो, तिने रुग्णालयात दाखल असूनही माझ्या आईने मला चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन दिले.'
आवेशच्या आईला दोन वर्षांपासून स्तनाचा कर्करोग आहे. त्यांच्यावर वारंवार किमोथेरपी होत असते. अलीकडेच त्यांना इन्फेक्शन झाले होतं त्यामुळे त्यांना हॉस्पीटलमध्ये हलविण्यात आले आहे. आई हॉस्पीटलमध्ये असतानाही खेळाला प्राधान्य देत केलेल्या आवेशच्या कामगिरीचं सध्या सगळीकडे कौतुक होतंय.