चंद्रपूर जिल्ह्यातील बल्हारपूर तालुक्यात पदवीधर युवकाने आधुनिक शेती करत लाखोचं उत्तपन्न घेतलयं. शेतकरी मोरेश्वर देरकर याने वडिलोपार्जित शेतात भाजीपाला आणि बहुमिश्रीत पिकं घेऊन कमी खर्चात इतरांसमोर आदर्श निर्माण केलाय. पदवीधर होताच मोरेश्वरने नोकरीचा शोध सुरु केला. परंतु नोकरी न मिळाल्याने वडिलांनी खांद्यावर घेतलेली नांगर त्याने स्वत:च्या खांद्यावर घेत पारंपारिक शेतीला सुरुवात केली. पारंपारिक शेतातून अधिकचं उत्पन्न न मिळाल्याने त्याने कृषी विभागाचा मार्गदर्शनाखाली बहुमिश्रीत शेतीला सुरुवात केली. टमाटर, वांगे, कारले, भेंडी, मेथी, चवळीचा शेंगा यांसह विविध पालेभाज्यांची लागवड केली जातीये. शेतात सिंचनाची सोयसुद्धा केलीये. पिकांच्या वाढीसाठी रासायनिक खते न वापरता सेंद्रिय खते, किटकनाशकाकडे यांचा वापर केलाय. यामुळे ग्राहकांचा ओढही त्याच्याच शेतीकडे अधिक आहे. तयार होणारा माल हा व्यापाऱ्यांना न विकता मोरेश्वर थेट परिसरातील बाजारात तसेच आजूबाजूच्या गावागावात जावून विकतो. कुटुंबाचा उदर्निवाह कसा करायचा या विवंचनेत असलेला मोरेश्वर आता याच शेतीतून लाखो रुपये कमावतोय. पदवीधर शेतकऱ्याने नोकरीची आशा सोडून शेतीमध्ये येऊन तरुणांपुढे एक आदर्श निर्माण केलायं.