अमरावती जिल्ह्यातील मोर्शी वरूड मतदारसंघाचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयारयांची अखेर हकालपट्टी करण्यात आली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पक्षप्रमुख राजू शेट्टी यांनी याबाबत गुरुवारी घोषणा केली. देवेंद्र भुयार हे गेल्या कित्येक दिवसांपासून पक्षप्रमुखांच्या संपर्कात नव्हते. यासोबतच पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमाला येत नव्हते यावरून मतदारसंघातही त्यांच्या विरोधात नाराजीचा सूर होता.अखेर गुरुवारी हिवरखेड येथे पक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पक्षप्रमुख राजू शेट्टी यांनी देवेंद्र भुयार यांच्या हकालपट्टीची घोषणा केली. विधानसभा निवडणुकीत देवेंद्र भुयार यांनी कृषी मंत्री अनिल बोंडे यांचा पराभव केला होता आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार म्हणून ते निवडून आले. दरम्यान आमदार देवेंद्र भुयार यांनी मंत्रिपदासाठी खासदार राजू शेट्टी यांच्याकडे आग्रह धरला. मात्र मंत्रिपद न मिळाल्यामुळे अनेक दिवसांपासून पक्षाच्या पहिल्या फळीतील नेते आणि देवेंद्र भुयार यांच्यामध्ये खटके उडत होते. अखेर राजू शेट्टींनी भुयार यांची पक्षातून हाकलपट्टी केल्याचा घोषणा केली.