Mumbai to Pune l मुंबई-पुणे प्रवास आणखी सुसाट,वरळी सी लिंक ते पुणे थेट जाता येणार | Sakal
मुंबई-पुणे प्रवास आणखी सुसाट आणि वेगवान होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएनं मुंबई पारबंदर प्रकल्प अर्थात शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू आता एक्स्प्रेस वेशी जोडण्याचा निर्णय घेतलाय. नुकत्याच झालेल्या बैठकीत या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी ९४७ कोटी २५ लाखांची कामं २ टप्प्यात करण्यात येणार आहेत. त्यासाठी ९४७ कोटी २५ लाख खर्च करण्याचा निर्णय घेतला. यातील पहिला टप्पा चिर्ले येथील आंतरबदल व सेवा रस्त्यावर ८५ कोटी ५० लाख खर्चाचा आहे. तर, दुसऱ्या टप्प्यात मुंबई पारबंदर प्रकल्प थेट मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गास विविध कामे करून जोडण्यात येणार असून यावर ८६१ कोटी ७५ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. यात ३० हेक्टर जमीन भूसंपादनासाठीच्या १५० कोटी रुपयांचाही समावेश आहे. मुंबई पारबंदर प्रकल्पाचे काम ४ पॅकेजमध्ये सुरू असून १७, ८४३ कोटींच्या खर्चास ३ जून २०१६मध्ये मान्यता देण्यात आली आहे. सध्या या प्रकल्पाचे काम जोमाने सुरू आहे.