जळगाव जिल्ह्यात अवकाळी पाऊस, हवामानातील बदल यामुळे आधीच संकटात सापडलेला शेतकरी रब्बी हंगामातही संकटात सापडला आहे. रब्बी पिकांसाठी मुबलक प्रमाणात थंडी असल्यास त्याचा पिकांना चांगला फायदा होतो. जानेवारी अखेरीस आणि फेब्रुवारीच्या सुरवातीला प्रचंड थंडी पडल्याने शेतकऱ्यांना पिकांसाठी फायदा झाला होता. परंतु कांदा रोपांवर मर व करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने संपूर्ण पिकाचे नुकसान झाले असून लागवडीचा खर्च निघाला नाही. शेतकर्यांचे सर्व कष्ट आणि मेहनत वाया गेली आहे. या रोगामुळे तोंडचा घास हिरावल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलयं. कांदा हातात येण्यापूर्वीच त्यावर पडलेल्या रोगामुळे कांदा उत्पादक शेतकरी हतबल झालाय. नुकसानाची भर कशी काढावी? उदरनिर्वाह कसा करावा? हा मोठा प्रश्न आता शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर उभा ठाकला असताना शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय.