पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाकडून आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी सागर बंगल्याच्या दिशेने येणाऱ्या सर्व मार्गांची नाकाबंदी केली. परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त होता. मात्र, या सगळ्यानंतरही काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सुरक्षाव्यवस्था भेदून आतमध्ये प्रवेश करण्यात यश मिळवले. अतुल लोंढे एकटेच सागर बंगल्याच्या परिसरात शिरले होते. गेटपासून काही अंतरावरच असताना पोलिसांच्या नजरेस पडले. त्यानंतर पोलिसांनी अतुल लोंढेच्या अक्षरश: मुसक्या आवळल्या. त्यानंतरही अतुल लोंढे यांनी घोषणा देण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्यांचे तोंड दाबून ठेवले आणि त्याच अवस्थेत अतुल लोंढे यांना गाडीत कोंबण्यात आले. यावेळी प्रसारमाध्यमांना पाहून अतुल लोंढे यांनी आपली भूमिका मांडण्याची प्रयत्नही केला. नरेंद्र मोदी यांनी शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान केला आहे, असे अतुल लोंढे यांनी म्हटले.