महाराष्ट्र काँग्रेसमुळे देशभरात कोरोना पसरला असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभर काँग्रेसनं आंदोलनं सुरु केलं. काँग्रेस नेत्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्याबाहेर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असल्याने सामान्य मुंबईकरांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच सामान्य मुंबईकरांना या आंदोलनामुळे मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. भाजप-काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याने पेडररोड, नेपेन्सी रोड, हाजीहली परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. हाजीआली, ग्रांट रोड, गिरगांव चौपाटी, केम्स कॉर्नर, मलबार हिलकडे जाणाऱ्या सगळ्या रस्त्यांवर वाहतूककोंडी आहे. पोलिसांकडून चोख बंदोबस्त करण्यात आला असून फडणवीसांच्या बंगल्याकडे जाणारे दोन्ही रस्ते बंद करण्यात आले. पोलिसांचाही मोठा फौजफाटाही तैनात असतानाही काँग्रेसच्या या आंदोलनामुळे रस्त्यांवर तुफान वाहतूक कोंडी पाहायला मिळाली.