#Union Budget 2022 l पुढच्या काही मिनिटांत अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करणार l Sakal
देशात सध्या उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड, मणिपूर या ५ राज्यातील निवडणुकांचे वारे वाहताहेत. त्यातच आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण २०२२-२३ या आर्थिक सालासाठी अर्थसंकल्प संसदेत सादर करतील. कोरोनाचं (Corona) संकट दोन वर्षांपासून ओढावलं असून अशा परिस्थितीत देशासह जागतिक अर्थव्यवस्थेसमोर यातून सावरण्याचे आव्हान आहे. अर्थव्यवस्थेला उभारी मिळण्यासाठी या अर्थसंकल्पात काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोरोनाचा फटका बसलेल्या क्षेत्राला दिलासा देणं आणि रोजगारनिर्मितीचं आव्हान केंद्र सरकारसमोर आहे.
आतापर्यंत काय घडलं?
अर्थमंत्रालयातून बाहेर आल्यानंतर निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्पाचा टॅब माध्यमांना दाखवला. याआधी ब्रिफकेसमधून अर्थसंकल्प आणला जात होता. मागील दोन वर्षांपासून ही परंपरा बदललीए आणि आता टॅबवरून अर्थसंकल्प सादर केला जातो.
त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सितारमण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेण्यासाठी राष्ट्रपती भवनाकडे रवाना झाल्या.
प्रस्थापित परंपरेनुसार, भारताच्या राष्ट्रपतींना सर्वप्रथम केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून अर्थसंकल्पातील तरतुदींची माहिती दिली जाते. केंद्रीय अर्थसंकल्पात राष्ट्रपती कोणतेही बदल सुचवत नसल्यामुळे औपचारिकता म्हणून ही बैठक होते. परंतु संसदेत अधिकृतपणे अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी अर्थमंत्र्यांना राष्ट्रपतींची परवानगी घ्यावी लागते. राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षेत मंत्रिमंडळाला संक्षिप्त स्वरुपात अर्थसंकल्पाबाबत माहिती देतात.
सकाळी ११ वाजता म्हणजेच पुढच्या काही मिनिटांत अर्थमंत्री निर्मला सीतारमण आर्थिक वर्ष 2022-23 साठी अर्थसंकल्प सादर करणार आहेत.