सध्या नागपूरसह विदर्भात थंडीची लाट आहे. त्यामुळं या थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोटीचा वापर केला जातोय. नागपूरात मात्र या शेकोटीसाठी चक्क दुचाकीच पेटवून दिल्याचा अजब प्रकार घडलाय. पोलिसांनी नुकतंच दुचाकी चोरणाऱ्या सरफराज टोळीला अटक केलीय. या टोळीने शहराच्या विविध भागातून 10 दुचाक्या चोरल्या होत्या. पोलिसांनी या चोरट्यांकडून 9 दुचाक्या हस्तगत केल्या. मात्र, एक दुचाकी कुठे आहे, हे विचारल्यावर गेल्या आठवड्यात थंडी फार होती, त्यामुळं थंडीपासून बचाव करण्यासाठी दुचाकी पेटवून दिल्याचं या चोरट्यांनी सांगितलं. थंडीपासून बचाव करण्यासाठी चक्क दुचाकी पेटवून दिल्यानं पोलिसही चक्रावले आहेत. मात्र, या प्रकाराची शहरात चांगकीच चर्चा आहे.