भारतात माझ्या जीवाला धोका आहे असे आता 9 हजार कोटींचे कर्ज बुडवणाऱ्या विजय मल्ल्याने म्हटले आहे. सोमवारी वेस्टमिनिस्टर कोर्टात प्री-ट्रायलसाठी विजय मल्ल्या आला होता. त्यावेळी त्याच्या वकिलांनी विजय मल्ल्याच्या जीवाला भारतात धोका असल्याचे पत्रकारांना सांगितले. मात्र हा विजय मल्ल्याचा नवा कांगावा आहे ही बाब उघड आहे. एकीकडे विजय मल्ल्याचे प्रत्यार्पण करण्यासाठी भारत सरकारकडून कसोशीचे प्रयत्न सुरू आहेत. अशात विजय मल्ल्याचे हे वक्तव्य समोर आले आहे. इतकेच नाही तर माझ्यावर लावण्यात आलेले सगळे आरोप निराधार असल्याचाही दावा विजय मल्ल्याने केला. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने या संदर्भातले ट्विट केले आहेत.याआधी विजय मल्ल्याने भारतातील तुरुंगांची अवस्था वाईट असल्याचे म्हटले होते. मात्र त्याचवेळी भारताने विजय मल्ल्याला मुंबईतील ऑर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात येईल असे युकेच्या अधिकाऱ्यांना सांगितले होते. मद्यसम्राट अशी ओळख असलेल्या विजय मल्ल्यावर भारतातील निरनिराळ्या बँकांचे 9 हजार कोटींचे कर्ज आहे. बँकांचे कर्ज चुकवण्याऐवजी विजय मल्ल्या देश सोडून पळाला. 2016 पासून मल्ल्या लंडनमध्ये आहे. भारताने ब्रिटन सरकारला मल्ल्याच्या प्रत्यापर्णासंदर्भात विनंती अर्ज केला होता. भारताच्या मागणीनंतर लंडन प्रशासनाने विजय मल्ल्याला रेड कॉर्नर नोटीस बजावत अटकही केली होती. मात्र त्यानंतर त्याला जामीन मिळाला होता.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews