मागील काही दिवसांपासून आपल्यातील अनेकांना बँकेकडून मेसेज, फोन किंवा मेलही येत आहेत. ज्यांनी बँकेकडे आपल्या आधारकार्डची झेरॉक्स दिलेली नाही अशांनी ती त्वरीत जमा करावी असे यामध्ये सांगण्यात येत आहे. आर्थिक व्यवहार जास्तीत जास्त सुरक्षित व्हावेत यासाठी मोदी सरकारने काही कठोर पाऊले उचलली आहेत. हा त्याचाच एक भाग आहे. पैशांची अफरातफर विरोधी नियमांनुसार बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करणं अनिवार्य असल्याचं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्पष्ट केलं आहे. नुकतेच काही माध्यमांकडून आरटीआयच्या आधारावर बँक खात्याशी आधार लिंक करणं अनिवार्य नसल्याचं वृत्त देण्यात आलं होतं. मात्र यावर आता आरबीआयने स्पष्टीकरण दिलं आहे. बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करण्यासाठी सरकारने ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. यापूर्वी तुम्ही आधार कार्ड लिंक न केल्यास खातं बंद होईल. खातं बंद झाल्यानंतर तुम्ही आधार कार्ड लिंक केलं तरच तुमचं बँक खातं पुन्हा चालू होऊ शकेल, असं अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केलं होतं. मात्र या सर्व प्रक्रियेसाठी किती वेळ जाईल, याबाबत नेमकी माहिती मात्र मंत्रालयाकडून देण्यात आलेली नाही.