Exclusive Video: ..अन् 'बाळू'चा असा झाला 'बाळूमामा' | BaluMama | Maharashtra | Sakal Media
परमेश तत्त्व कधी, कुठे, कसे आणि कोणत्या स्वरूपात प्रकट होईल हे सांगता येत नाही. घरच्या बकऱ्या , मेंढ्या जंगलात चरायला नेणारा धनगर कुटुंबातील लहानग पोर अंगभूत कर्तृत्वानं आणि देवत्वानं पुढे मोठा होऊन जगाचा प्रतिपाळ करतो, केवळ एका हाकाऱ्याने बकऱ्यांचा कळप मार्गी लावणारा हा अलौकिक मुलगा पुढे विकृतीच्या मार्गानं जाऊ पाहणाऱ्या समाजाला सन्मार्गावर आणून सोडतो, हे म्हटलं तर अतार्किक आणि म्हटलं तर समजण्या-उमगण्याच्याही पलीकडचं आहे.
3 ऑक्टोबर 1892 रोजी बेळगावनजीक चिक्कोडी तालुक्यातील ‘अक्कोळ’ या आडवळणी खेडेगावात परमेश्वराची चिमुकली पावले अवतरली अन् मायाप्पा आरभावे व त्यांची पत्नी सत्यव्वा या सात्विक धनगर जोडप्याच्या पोटी बाळूमामांचा जन्म झाला. बालपणातलं जगावेगळं वागणं सुधारावं म्हणून त्यांना अक्कोळ इथल्या जैन व्यापारी चंदूलाल शेठजी यांच्याकडे चाकरीला ठेवलं. शेठजी कुटुंबीयांकडून जेवणाचं ताट बदलण्याचं निमित्त होवून, बहीण गंगुबाई हि-याप्पा खिलारे हिच्याकडे मामा राहू लागले. त्यांचे भाचे बाळूमामांना मामा म्हणत असत. तेंव्हापासून ते भाच्यांचे मामा आणि जगाचे 'बाळूमामा' झाले.
लहानांपासून थोरापर्यंत, गरीबांपासून श्रीमंतापर्यंत व अडाण्यापासून विद्वानापर्यंत सर्व स्तरातील स्त्री-पुरूष त्यांचे भक्त होते व आहेत. शर्ट, धोतर फेटा, कांबळा, कोल्हापुरी चप्पल हा त्यांचा पेहराव. भाजी भाकरीचा साधा आहार त्यांना आवडे. ऊन, वारा, पाऊस किंवा थंडी असो.. बक-यांसवे शिवारातचं त्यांचा मुक्काम असे. गोरगरिबांना अन्नदान व्हावे, ते भक्ती मार्गाला लागावेत म्हणून त्यांनी १९३२ सालापासून भंडारा उत्सव चालू केला.
श्रीक्षेत्र आदमापूर हे देवअवतारी बाळूमामा यांचे समाधीस्थान आहे. जे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भुदरगड तालुक्यात आहे. बाळूमामांच्या वास्तव्यात पावन असे हे जागृत स्थान आहे. जिथं येण्यासाठी अनेक मार्ग आहेत. रेल्वेने आल्यास कोल्हापूर स्टेशनवर येऊन कोल्हापूर-मुरगूड एसटीने आदमापूर येथे येऊ शकतो. तसेच निपाणी-राधानगरी, कोल्हापूर-राधानगरी या एसटीने ही येथे येऊ शकतो. आदमापूर हे बाळूमामांच्या भक्तांसाठी श्रद्धेचं ठिकाण आहे. आज मामांची पुण्यतिथी त्यानिमित्त सकाळच्या माध्यमातून 'जन्मभूमी ते कर्मभूमी' असा केलेला हा लेखाजोखा..
#SakalMedia #Maharashtra #Balumama #ExclusiveVideos