सकाळने सोलापुरात पाऊल टाकले त्याला आज 19 वर्षे पूर्ण होत आहेत. दुसऱ्या दशकाच्या पूर्ततेकडे वाटचाल करताना "सकाळ'ने सोलापुरात सकारात्मक पद्धतीने पत्रकारिता करत समाजाला दिशा देण्याचे काम केले. प्रदूषणमुक्त संभाजी तलावासाठी सातत्याने पाठपुरावा केला. दबावगट निर्माण करीत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मालिका प्रसिद्ध केली. महापालिका, राज्य व केंद्र सरकारकडे यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून सध्या या तलावाच्या सुशोभिकरणाचे व प्रदूषणमुक्त करण्याचे काम सुरु आहे. गेल्या वर्षभरातील ही मोठी उपलब्धी आहे. समाजातील विविध प्रश्नांवर प्रहार करताना चांगल्या कामाचे कौतुक करण्यातही "सकाळ'ने हात आखडता घेतला नाही. मावळत्या वर्षात जिल्ह्यातील नऊ ठिकाणी तनिष्का गटाच्या माध्यमातून गाळ काढण्याचे काम पूर्ण केले. सोलापूर-अक्कलकोट महामार्ग वटवृक्षादित करण्याचे नियोजन करीत 300 झाडे लावण्याचे काम केले. "सकाळ'ने सातत्याने पाठपुरावा केल्याने सोलापूरला स्मार्ट सिटीचा दर्जा मिळाला. स्मार्ट सिटीची कामे पूर्ण व्हावीत, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. दोन वर्षांपासून सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना डिजिटल करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. "सकाळ'मधील "माझी शाळा गुणवत्तापूर्ण शाळा' या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील 153 शाळांमध्ये ई-लर्निंग किट बसविण्यात आले आहे. याचा आदर्श घेत अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळा डिजिटल केल्या. यामुळे कोरोनासारख्या महामारीच्या काळात घरबसल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेण्याची संधी मिळाली. भविष्यात आध्यात्मिक पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार, उद्योग मिळण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून लोकसहभागातून हिप्परगा तलावाच्या सुशोभिकरणासाठी पाठपुरावा सुरू आहे. प्रशासन पातळीवर याला प्रतिसाद मिळत आहे. बदलत्या व नव्या आयामांना सामोरे जाताना पत्रकारितेच्या मूल्यांची जपणूक करण्याचा वसा "सकाळ'ने जपला आहे.
गेल्या दहा महिन्यांपासून कोरोनासारख्या जागतिक महामारीचा सामना करताना दिसलेल्या माणुसकीला आमचा सलाम ! यंदाचे वर्ष अत्यंत बिकट स्थितीचे झाले. परंतु आपण त्यावर मात करीत मार्गक्रमण करीत आहोत. समाजातील सामान?