मूल (जि. चंद्रपूर) ः 1958 मध्ये स्थापन झालेल्या नाग विदर्भ चरखा संघास सध्यपरिस्थितीत उत्पादन क्षमतेला फटका बसला आहे. आजही येथे 20 ते 25 घरांमध्ये आधुनिक चरख्यावर सूतकताई केली जाते. यातून महिलांना रोजगाराची संधी प्राप्त झाली आहे. कोरोना महामारीच्या काळातही येथे घरोघरी सूतकताई सुरू होती. कच्चा माल घरी नेऊन त्यातून सूतगुंडी तयार केली जाते. एक महिला सूत कारागीर दर पंधरवड्याला 960 रुपये कमाविते. येथे सूतकताई होत असली तरी विणकरांचा मोठा अभाव सातत्याने जाणवत आहे. याआधी मूल तालुक्यातील मूल, मारोडा, विरई, हळदी या भागात विणकरांकडून खादीचे कापड विणले जात असायचे. मात्र, काळानुरूप खादी विणाई बंद झाली. नाग विदर्भ चरखा संघाला आजही विणकरांची प्रतीक्षा आहे.